दुष्काळसदृश परिस्थितीत अटकळीत कर वसुलीचा तगादा
!शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही, मग कर भरायचा कुठून? ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थांचे प्रश्नचिन्ह
बिलोली तालुक्यातील अटकळी येथे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी व शेतमजूर आर्थिक अडचणीत सापडले असताना ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व इतर कर वसुली सुरू असल्याने ग्रामस्थांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. गावातील बहुतांश कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असून, शेतीची परिस्थिती प्रतिकूल असल्याने अनेकांच्या हाताला काम मिळत नाही. अशा परिस्थितीत ग्रामस्थांनी कर भरायचा तरी कुठून, असा सवाल उपस्थित होत आहे.अटकळी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी देवराव हंबिरे यांच्या कार्यपद्धतीवरही ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गावातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना दिलासा देण्याऐवजी कर वसुलीवर भर दिला जात असल्याची चर्चा आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत कर वसुली केली जात असताना, आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी ग्रामपंचायतीकडून कोणती पावले उचलली जात आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.दरम्यान, ग्रामपंचायत अधिकारी नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत नसल्याची तक्रारही ग्रामस्थांकडून केली जात आहे. गावातील पाणीपुरवठा, वीज आणि इतर मूलभूत सुविधांबाबत नियोजन करून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रभावी प्रयत्न होणे अपेक्षित असताना, या प्रश्नांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप होत आहे.दुष्काळसदृश परिस्थितीत ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून देणे, पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि मूलभूत सुविधा सुरळीत ठेवणे याला प्राधान्य देण्याची गरज आहे. केवळ कर वसुली न करता ग्रामस्थांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.आता अटकळी ग्रामपंचायत प्रशासन या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देणार का? ग्रामपंचायत अधिकारी देवराव हंबिरे यांच्या उपस्थितीबाबत आणि गावातील मूलभूत सुविधांच्या नियोजनाबाबत वरिष्ठ अधिकारी चौकशी करणार का? तसेच दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी कोणती उपाययोजना केली जाणार, याकडे अटकळी ग्रामस्थांचे लक्ष लागले











