मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जदारांना त्रास दिल्यास वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते धावून जाणार!
गरीब जनता, शेतकरी व कामगारांना हप्त्यांसाठी धमकावल्यास तात्काळ हस्तक्षेप करा; संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे शंकर महाजन यांचे निर्देश
नांदेड प्रतिनिधी : विनोद वाघमारे
नांदेड जिल्ह्यासह बिलोली तालुक्यातील विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या एजंट व व्यवस्थापकांकडून कर्जदार गरीब जनता, शेतकरी आणि कामगार वर्गाला कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तगादा लावणे, तसेच विविध प्रकारे धमकावणे किंवा मानसिक त्रास देण्याचे प्रकार घडत असल्यास अशा प्रकारांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विरोध करण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांच्या आदेशानुसार बिलोली तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून त्रस्त असलेल्या शेतकरी, कष्टकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधल्यास संबंधित कार्यकर्त्यांनी तात्काळ त्यांच्या मदतीसाठी घटनास्थळी जावे. संबंधित मायक्रो फायनान्स कंपनीचे एजंट व मॅनेजर यांच्याशी संपर्क साधून कर्जदारांची बाजू मांडावी आणि त्यांना योग्य पद्धतीने समज देण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.दरम्यान, संबंधित कंपनीचे मॅनेजर, एजंट किंवा इतर कर्मचाऱ्यांकडून अरेरावी, अपमानास्पद भाषा, धमकी अथवा बेकायदेशीर दबाव टाकण्याचा प्रकार घडल्यास त्याची दखल घेऊन तात्काळ संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. तसेच उपलब्ध पुरावे व तक्रारींच्या आधारे कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.याशिवाय, या संदर्भात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या बिलोली तालुक्यातील माजी पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.गरीब, शेतकरी आणि कष्टकरी जनतेला आर्थिक अडचणीच्या काळात धमकावून मानसिक त्रास देण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अन्यायग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी कार्यकर्त्यांनी तत्पर राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांनी केले आहे.










