आरोग्य सुविधांसाठी आमदार जितेश अंतापूरकर यांचा शासनदरबारी पाठपुरावा!
बिलोलीत सीटी स्कॅन; कुंडलवाडी उपजिल्हा
देगलूरमध्ये ५० खाटांचे महिला रुग्णालय, रुग्णालय सुरू करण्याची मागणी
आरोग्यमंत्र्यांसोबतच्या ‘आरोग्य संवाद’ बैठकीत ग्रामीण भागातील आरोग्य समस्यांवर वेधले लक्ष
बिलोली प्रतीनीधी विलास शेरे
देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण आणि सीमावर्ती भागातील आरोग्य सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांना दर्जेदार व वेळेवर वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी आमदार जितेश अंतापूरकर यांनी शासनदरबारी विविध मागण्यांचा पाठपुरावा सुरू केला आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आयोजित विशेष ‘आरोग्य संवाद’ बैठकीत आमदार अंतापूरकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेत मतदारसंघातील आरोग्यविषयक प्रश्न मांडले.
या बैठकीत त्यांनी देगलूर येथे ५० खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालय, बिलोली येथे सीटी स्कॅन सुविधा, कुंडलवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे रखडलेले लोकार्पण, १०० खाटांच्या रुग्णालयासाठी मंजूर निधीचे वितरण तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये २४ तास डॉक्टरांची उपलब्धता या महत्त्वपूर्ण मागण्यांकडे आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
देगलूरमध्ये स्वतंत्र महिला रुग्णालयाची मागणी
देगलूर व परिसरातील महिलांना प्रसूती, स्त्रीरोग आणि इतर आरोग्यविषयक उपचारांसाठी स्वतंत्र व सुसज्ज रुग्णालयाची आवश्यकता आहे. त्यामुळे देगलूर येथे ५० खाटांचे विशेष महिला रुग्णालय मंजूर करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार अंतापूरकर यांनी केली.
बिलोलीत सीटी स्कॅन सुविधा कधी सुरू होणार?
अपघात, मेंदूला झालेली दुखापत आणि गंभीर आजारांच्या निदानासाठी सीटी स्कॅन अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, बिलोली परिसरातील रुग्णांना या तपासणीसाठी नांदेड किंवा हैदराबाद गाठावे लागत आहे. लांबचा प्रवास, आर्थिक खर्च आणि उपचारास होणारा विलंब यामुळे रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बिलोली येथील शासकीय रुग्णालयात सीटी स्कॅन मशीन तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दोन वर्षांनंतरही कुंडलवाडी उपजिल्हा रुग्णालय प्रतीक्षेत!
कुंडलवाडी येथील उपजिल्हा रुग्णालय मंजूर होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला असतानाही आवश्यक डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि वैद्यकीय साहित्याअभावी रुग्णालयाचे लोकार्पण रखडले आहे. इमारत उभी असताना आरोग्यसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागत आहे. त्यामुळे आवश्यक मनुष्यबळ व वैद्यकीय साहित्य तातडीने उपलब्ध करून रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी आमदारांनी केली.
१०० खाटांच्या रुग्णालयाचा निधी तातडीने वितरित करा
मतदारसंघातील १०० खाटांच्या सुसज्ज रुग्णालयासाठी निधी मंजूर झाल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले. मात्र, प्रशासकीय व तांत्रिक अडचणींमुळे निधी वितरणाची प्रक्रिया रखडल्याने पुढील कामांना विलंब होत आहे. हे अडथळे दूर करून मंजूर निधी तातडीने वितरित करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
रात्रीच्या वेळी डॉक्टर अनुपस्थित असल्याच्या तक्रारी
ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रात्रीच्या वेळी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये २४ तास डॉक्टर व आवश्यक कर्मचारी उपस्थित राहतील, यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी आणि नियमित तपासणी करावी, अशी मागणी आमदार अंतापूरकर यांनी केली.
मतदारसंघातील आरोग्य सुविधांमधील त्रुटी दूर करून ग्रामीण व सीमावर्ती भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच उपचार मिळावेत, हा या मागण्यांमागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता या मागण्यांवर आरोग्य विभाग आणि शासनाकडून कोणती ठोस कार्यवाही होते, याकडे देगलूर-बिलोली मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
“शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविणार!”
“मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत मोफत, दर्जेदार आणि आधुनिक आरोग्यसेवा पोहोचविणे हे माझे प्रमुख कर्तव्य आहे. निधीची कमतरता किंवा मनुष्यबळाचा अभाव यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होऊ देणार नाही. आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि नागरिकांना हक्काचे उपचार मिळवून देण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील.”











