सगरोळी गणात शिवसेना शिंदे गटाकडून आनंदाचा शिधा किटचे वाटप
दुष्काळग्रस्त व गरजू कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी उपक्रम; सात गावांतील लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
**बिलोली प्रतिनिधी:विनोद वाघमारे
सगरोळी गणातील बोळेगाव, बाभळी, लघुळ, गंजगाव, माचनूर, शिंपाळ व कार्ला या गावांतील गरजू व दुष्काळग्रस्त कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्यात आले. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम स्वखर्चाने राबविण्यात आला.
या किटमध्ये साखर, खाद्यतेल, मैदा, रवा, पोहे आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबांना सण-उत्सव आनंदाने साजरे करता येत नाहीत. अशा गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलावा, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शासनाकडून आनंदाचा शिधा उपक्रम बंद करण्यात आल्यानंतरही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू ठेवण्यात आला आहे, अशी माहिती शिवसेना बिलोली तालुकाध्यक्ष बाबाराव रोकडे पाटील यांनी दिली.
संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सेवाश्रम वसतिगृह येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील हायगले, अशोक पाटील खिरप्पवार, गंगाधर नरवाडे, लक्ष्मण शेट्टीवार, शिवकुमार कोदळे, व्यंकटराव बामणे, स्वरूप पाटील जाधव, माधव शिरगिरे, हणमंत बोधनापोड, पुरुषोत्तम पांचाळ, राजू आंबे, अरविंद बुच्छलवार, सतीश बुच्छलवार, प्रकाश मिचापुरे, माधव बोडके, प्रभू मुत्तेपोड, अर्जुन बोडके आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा वाडिकर यांनी केले. या उपक्रमाला सगरोळी परिसरातील शेकडो महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .











