एसबीआय बँकेत शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर द्या आ.अंतापूरकरांचा बँक अधिकारी-याना स्पष्ट इशारा….
बिलोली प्रतिनिधी :- विलास शेरे
देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील शेतकरी सध्या दुष्काळाच्या गंभीर संकटाला सामोरे जात असून आर्थिक अडचणींमुळे हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असताना सत्कार स्वीकारणे योग्य नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर होत नाहीत, तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही, अशी ठाम भूमिका आमदार जितेश अंतापूरकर यांनी घेतली.
आमदार अंतापूरकर यांनी रामतीर्थ (ता. बिलोली) येथील भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) शाखेला भेट देऊन बँक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शासनाच्या कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना अनावश्यक तांत्रिक अडचणी न सांगता तातडीने नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी शाखा व्यवस्थापकांना दिले.
परिसरात निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थिती, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, शेतीचा वाढता खर्च आणि उत्पन्नातील घट यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा कठीण काळात बँकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. विशेषतः कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देताना येणाऱ्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशी आग्रही भूमिका आमदारांनी मांडली.
सत्कारापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे!
दरम्यान, आमदारांच्या स्वागतासाठी बँकेच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मतदारसंघातील शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत असताना आणि पीक कर्जासाठी बँकेच्या चकरा मारत असताना आमदार अंतापूरकर यांनी सत्कार स्वीकारण्यास नकार दिला. “माझ्या मतदारसंघातील शेतकरी संकटात असताना मी सत्कार स्वीकारणार नाही. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे प्रश्न मार्गी लागणे हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
कागदपत्रांच्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक नको!
पीक कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, अशा सूचना आमदार अंतापूरकर यांनी एसबीआयचे फिल्ड ऑफिसर नागेश कत्ते यांना दिल्या. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घ्याव्यात, कर्जप्रक्रिया सुलभ करावी आणि पात्र शेतकऱ्यांना विनाकारण बँकेच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी आवश्यक सहकार्य करावे, असेही त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितले.
याप्रसंगी किनाळा येथील सरपंच विठ्ठल माने, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष ब्रह्मा भाऊ रामतीर्थकर, सरपंच तिरुपती डाकोरे, आकाश कोकणे, बाबाराव रोकडे, लक्ष्मण पाटील देगलुरे, मुरलीधर देगलुरे, संतोष भक्तापुरे, श्याम पाटील तोडे यांच्यासह परिसरातील शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बँकेच्या वतीने शाखा व्यवस्थापक हावगीरराव देशमुख, फिल्ड ऑफिसर नागेश कत्ते, सोमपुरे, अंबादास, मनोज कावळे, ओमकार आणि लक्ष्मीकांत कुलकर्णी उपस्थित होते. आमदारांनी मांडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची बँक अधिकाऱ्यांनी दखल घेत प्रलंबित कर्जप्रकरणे प्राधान्याने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून सत्कारापेक्षा त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका आमदार अंतापूरकर यांनी घेतल्याने उपस्थित शेतकरी व नागरिकांनी या निर्णयाची दखल घेतली.











