बोळेगावात क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहात साजरी!
जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी लढणाऱ्या महानायकाला मान्यवरांकडून अभिवादन
बिलोली प्रतिनिधी : विनोद वाघमारे
बोळेगाव, ता. बिलोली येथे रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी आदिवासी समाजाचे महानायक तथा थोर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास बोळेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रतिनिधी विश्वनाथ बोधनापोड, सोसायटीचे चेअरमन अशोक पाटील शिवोपनोर तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य रेडी राजू बोधनापोड यांची उपस्थिती होती.
भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक सत्तेविरोधात संघर्ष करून आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी ऐतिहासिक लढा दिला. जल, जंगल आणि जमीन या नैसर्गिक साधनसंपत्तीवरील आदिवासींच्या अधिकारांसाठी त्यांनी जनजागृती केली. अन्याय, शोषण आणि गुलामगिरीविरोधात त्यांनी उभारलेला संघर्ष आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे.
त्यांचे विचार, सामाजिक कार्य आणि क्रांतिकारी योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या आदर्श विचारांचा वारसा जपण्याचा आणि सामाजिक एकता अधिक दृढ करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.










