# आदमपूर परिसरात अवैध देशी दारूचा महापूर! रामतीर्थ पोलिसांचे डोळेझाक धोरण की विक्रेत्यांना अभय?**
गावोगावी अवैध दारू विक्रीचा आरोप; तरुणाई व्यसनाच्या विळख्यात, महिलांचे संसार धोक्यात! वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी****
बिलोली प्रतिनिधी : विनोद वाघमारे**
बिलोली तालुक्यातील आदमपूर परिसरात अवैध देशी दारू विक्रीचा प्रकार सुरू असल्याचा आरोप होत असून, या प्रकारामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. अवैध दारू विक्रीला आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतच हा प्रकार सुरू असल्याची चर्चा होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.एकीकडे शासन व्यसनमुक्तीचा संदेश देत असताना दुसरीकडे आदमपूर परिसरात अवैध देशी दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या विक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाण्याची भीती व्यक्त होत आहे. अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडण्याबरोबरच कौटुंबिक वाद आणि सामाजिक समस्यांनाही खतपाणी मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.**मग अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई का नाही?**अवैध दारू विक्रीचा प्रकार संबंधित पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला जातो का? कारवाई होत नसेल तर त्यामागचे कारण काय? परिसरात नियमित गस्त आणि तपासणी केली जाते का? असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत असला तरी या प्रकरणाची वस्तुस्थिती अधिकृत चौकशीतून स्पष्ट होणे आवश्यक आहे.**वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी!**आदमपूर परिसरातील अवैध देशी दारू विक्रीच्या आरोपांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी. प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विक्रेत्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील कारवाईचा आढावा घेऊन अवैध दारू विक्रीला कायमचा आळा घालावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.











