क्रांती, संघर्ष आणि स्वाभिमानाचा जागर; भव्य मिरवणुकीत पुष्पहार अर्पण करून ‘धरती आबा’ यांना मान्यवरांचे अभिवादन; समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग!
बिलोली प्रतिनिधी : विनोद वाघमारे
सगरोळी येथे महान आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवर व समाजबांधवांनी विनम्र अभिवादन केले. जय बिरसा!च्या जयघोषाने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, व्यंकटराव बामणे, सुरेश गोईनोड, राजू बाबणे, व्यंकट पा. समन, गंगाधर महाजन, प्रभू मामा मुत्तेपोड, चिन्नना बुच्छलवार, गोपाळ मुत्तेपोड, गणपत यडलोड, दत्तू दम्मायावार यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते.
भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे आणि संघर्षाचे प्रतीक आहेत. त्यांनी जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध ऐतिहासिक लढा उभारला. आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत त्यांनी समाजाच्या हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या क्रांतिकारी लढ्यामुळे त्यांना आदिवासी समाजात ‘धरती आबा’ म्हणून आदराचे स्थान प्राप्त झाले.
त्यांचे विचार केवळ आदिवासी समाजापुरते मर्यादित नसून अन्यायाविरुद्ध लढण्याची, आपल्या हक्कांसाठी संघटित होण्याची आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देणारे आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त सगरोळी येथे आयोजित कार्यक्रमातून सामाजिक एकता, बंधुता आणि महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यात आला.
भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवनाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून समाजात एकता, स्वाभिमान आणि सामाजिक जागृती अधिक बळकट करण्याचा संकल्प यावेळी उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केला.
जय बिरसा! जय आदिवासी!











