अटकळीच्या ‘सेवा पेट्रोलियम’मध्ये ग्राहकांची गैरसोय!
पिण्याचे पाणी नाही, स्वच्छतागृहाला कुलूप; हवा भरण्याची सुविधाही गायब!पेट्रोल पंपावर मूलभूत सुविधांचा अभाव; ग्राहकांच्या हक्काच्या सुविधांकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष? पेट्रोलियम कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी
नांदेड प्रतिनिधी :विलास शेरे
बिलोली तालुक्यातील अटकळी येथील ‘सेवा पेट्रोलियम’ केंद्रावर ग्राहकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याचे चित्र समोर आले आहे. पेट्रोल-डिझेल विक्रीसाठी केंद्र सुरू असताना ग्राहकांना मात्र पिण्याचे पाणी मिळत नाही, स्वच्छतागृह असूनही ते बंद अवस्थेत आहे, तर वाहनांमध्ये हवा भरण्याची सुविधाही उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या सोयी-सुविधांबाबत संबंधित पेट्रोलियम केंद्राच्या व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच लांब पल्ल्याचा प्रवास करणारे वाहनधारक येत असतात. अशा वेळी पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, अटकळी येथील सेवा पेट्रोलियम केंद्रावर स्वच्छतागृह असूनही ते वापरासाठी बंद असल्याचे चित्र आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. त्यातच वाहनांमध्ये हवा भरण्याची सुविधाही उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना इतरत्र धाव घ्यावी लागत आहे.पेट्रोल विक्रीसाठी तत्परता, मग ग्राहकांच्या मूलभूत सुविधांबाबत उदासीनता का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून ग्राहकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शक नियम व मानके असताना प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होते की नाही, याची तपासणी होणे गरजेचे आहे.संबंधित पेट्रोलियम कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बंद असलेले स्वच्छतागृह ग्राहकांसाठी खुले करणे आणि वाहनांमध्ये हवा भरण्याची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी. ग्राहकांना केवळ इंधन विक्री न करता आवश्यक मूलभूत सुविधाही उपलब्ध करून देणे ही संबंधित व्यवस्थापनाची जबाबदारी आहे.ग्राहकांच्या मूलभूत सुविधांसाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार? वरिष्ठ अधिकारी या प्रकाराची दखल घेऊन सुधारणा करणार की ग्राहकांची गैरसोय अशीच सुरू राहणार? असा सवाल अटकळी परिसरातील वाहनधारकांकडून उपस्थित होत आहे.










