विलास शेरे )
बिलोली तालुक्यातील मौजे दौलापूर येथील गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश अखेर २०२६ मध्ये झाला आहे. २०२१ ते २०२५ या काळात शेतकऱ्यांच्या नावावर खोटी कागदपत्रे तयार करून सरकारी निधीचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनरेगाअंतर्गत खोटे जॉबकार्ड तयार करून, बनावट सातबारा उतारे सादर करून विहीर खोदकामासाठी लाखो रुपयांचा निधी लाटण्यात आला.
तक्रारदार १०-१२, अजून किती दाबले गेले?
स्थानिक १०-१२ तक्रारदारांनी वारंवार तक्रारी देऊनही प्रशासनाकडून कारवाई न झाल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. अजून किती तक्रारी दाबल्या गेल्या, याबद्दलही शंका व्यक्त केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांना आपल्या नावावर विहीर मंजूर झाली हेच माहित नाही, अशा किती शेतकऱ्यांच्या नावावर बोगस विहिरी काढून शेतकऱ्यासह शासनाची फसवणूक केली गेली, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
२०२६ मध्ये प्रकरण समोर, २०२१ ते २०२५ पर्यंत किती बोगस विहिरी?
हे प्रकरण जरी २०२६ मध्ये उघडकीस आले असले, तरी हा खेळ २०२१ पासून सुरू असल्याचा आरोप तक्रारदार करत आहेत. मग २०२१ ते २०२५ पर्यंत बिलोली तालुक्यात अशा किती बोगस विहिरी खोदल्या गेल्या? याची शहानिशा होणे गरजेचे आहे.
पुरावा मिटवताना JCB फसली, बीडीओंनी ताब्यात घेतली का?
गेल्या आठवड्यात दौलापूरच्या शेतात पुरावे नष्ट करण्यासाठी JCB च्या साहाय्याने माती भरून खड्डा बुजवण्याचा प्रयत्न सुरू असताना JCB चिखलात अडकून पडली. ग्रामस्थांनी हा प्रकार पाहून व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर हा विषय चर्चेत आला. प्रश्न उपस्थित होत आहे की, बीडीओंनी JCB ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे का? की पुरावे नष्ट झाल्यानंतर केवळ थंडाबस्त्यात टाकले जात आहे.
बीडीओ पदमवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
बिलोली पंचायत समितीचे बीडीओ पदमवार यांच्यावर शेतकऱ्यांकडून गंभीर आरोप होत आहेत. शेतकऱ्यांचे मुडदे पाडून लोणी खाणाऱ्यांना बीडीओ वाचवणार का, असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. तक्रारदारांचे म्हणणे आहे की, बीडीओ कार्यालयातच बनावट कागदपत्रे तयार करून शेतकऱ्यांना मॅनेज करून प्रशासनाची फसवणूक केली गेली.
तक्रारदारांनी या संपूर्ण घोटाळ्याची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी समिती नेमून सर्व २०२१-२५ दरम्यान मंजूर झालेल्या विहिरींची स्थळ चौकशी करावी आणि दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे.
*(या संदर्भात बीडीओ पदमवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही. त्यांची बाजू प्राप्त झाल्यास प्रसिद्ध करण्यात येईल.)









